सलुन / पार्लर व्यवसायाला अत्यावश्यक दर्जा द्या..... राष्ट्रीय जनसेवा पक्षाची मागणी.......
सलुन/पार्लर व्यवसायाला अत्यावश्यक दर्जा द्या....
राष्ट्रीय जनसेवा पक्षाची मागणी..
प्रतिनिधी : संजय पंडित
दि.२२ ठाणे : राज्यातील सलून आणि ब्युटी पार्लर व्यवसायाचा अत्यावश्यक सेवेत समावेश करण्याबाबतची महत्वपूर्ण मागणी आज राष्ट्रीय जनसेवा पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदना द्वारे करण्यात आली.
महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात बारा बलुतेदारात नाभिक समाज वर्षानुवर्षे विविध मागण्यांपासून वंचित असल्याचे निवेदनात म्हटले आहे.राज्यात जवळ जवळ ४२ लाखाच्या वर नाभिक समाज असून समाजातील ९० टक्के लोक आजही त्यांच्या पारंपरिक सलून व्यवसायात कार्यरत आहेत. वर्षानुवर्षे आर्थिक दृष्ट्या मागासलेला हा समाज विकासाच्या प्रवाहात आणणे गरजेचे असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सामाजिक आरक्षण,सलून व्यवसायाच्या आधुनिकते करीता केश शिल्पी बोर्ड, अट्रासिटी कायदा,या सोबतच सलून व्यवसायाला अत्यावश्यक सेवेचा दर्जा मिळणे या प्रामुख्याने समाजाच्या महत्वाच्या मागण्या प्रलंबित असल्याचे निवेदनाद्वारे म्हटले आहे.
कोरोनाच्या लॉक डाऊन काळात सर्वात जास्त नुकसान सलून आणि पार्लर व्यवसायाचे झाले. इतर कोणतेही उपजीविकेचे साधन या समाजाला नसल्याने या समाजावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली होती.याच दरम्यान आर्थिक टंचाईला कंटाळून ४० च्या वर सलून व्यवसायिकांनी आत्महत्या केल्या आहेत.आजही त्यांचे कुटुंबीय सरकारी मदतीच्या प्रतिक्षेत आहेत असेही निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान लॉक डाऊन संपूनही गैरसमजामुळे ग्राहकांनी या व्यवसायाकडे पाठ फिरवल्याने समस्त सलून आणि पार्लर व्यवसायिक आजही आर्थिक विवंचनेत आहेत.वाढती महागाई, घर,दुकान भाडे,विविध बँकांचे कर्जाचे हफ्ते फेडून उदरनिर्वाह कसा करायचा या चिंतेने सर्वांना ग्रासले आहे.म्हणून सरकारने या कामी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे
प्राचीन काळापासून नाभिक समाजाला वैद्यकीय सेवेचा वारसा असून आजही विविध हॉस्पिटल मधे सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिेया करण्या अगोदर सलून सेवा नाभिक बांधवच देत असतात.आजच्या युगात लहानांपासून वृद्धांपर्यंत सलून सेवा अत्यंत गरजेची सेवा बनली असून सलून व्यवसायात सर्व प्रकारच्या स्वच्छतेसह,साहित्य निर्जंतुकीकरण करूनच विविध प्रकारच्या सेवा दिल्या जातात.
तसेच आपल्या हिंदू धर्मातील मुंज,बारसे तथा दशक्रिया सारख्या अंत्यविधी देखील नाभिक समाजातील सलून व्यवसायिकांनाच कराव्या लागत असल्याचे म्हंटले आहे
एकंदरीत सलून सेवेत येणाऱ्या सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवा सलून व्यवसायिक देत असून या सलून आणि ब्युटी पार्लर व्यवसायिकांचा सहानुभूतीने विचार व्हावा आणि या व्यवसायाला अत्यावश्यक सेवेचा दर्जा द्यावा अशी महत्वपूर्ण मागणी राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे उपाध्यक्ष,पत्रकार संजय पंडित केली आहे.या अत्यावश्यक सेवेच्या दर्जामुळे सलून/पार्लर व्यवसायाला प्रोत्साहन मिळेल आणि समस्त नाभिक समाजाला विकासाच्या प्रवाहात येण्याची संधी प्राप्त होईल असेही निवेदनात नमूद केले असल्याचे पक्षाध्यक्ष महावीर गाडेकर यांनी सांगितले.सल्लागार शेखर काका भोर,तुकाराम सोनवणे,गोपीनाथराव बिडवे,गजानन राऊत आदी मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
Comments
Post a Comment