पाच लाखाची खंडणी मागणाराच्या आवळल्या मुसक्या आकोट पोलीसांनी अवघ्या २४ तासात फत्ते केले मिशन
*पाच लाखाची खंडणी मागणाराच्या आवळल्या मुसक्या आकोट पोलीसांनी अवघ्या २४ तासात फत्ते केले मिशन. महिला पोलिस अधिकारी रितु खोखर यानी जातीने मोहीम राबवली*
अरुण काकड
आकोट तालुक्यातील ग्राम आकोली जहागीर येथिल रहिवासी असलेल्या एका प्रसिद्ध व्यावसायीकास ५ लक्ष रुपयांची खंडणी मागणारास आकोट शहर व ग्रामिण पोलिसानी संयुक्त सापळा रचून फिल्मी स्टाईलने अवघ्या २४ तासात अटक केली आहे. आकोट उपविभागिय पोलीस अधिकारी रितु खोखर यानी या मोहिमेत जातीने सहभाग घेवून ही कामगिरी फत्ते केली आहे. ह्या द्रुतगती कारवाईने आकोट शहरात सर्वत्र पोलीसांच्या कर्तबगारीचे कौतुक होत आहे.
ह्या खळबळजनक घटनेची हकिगत अशी आहे कि, दि. २५ जुलै रोजी अकोली जहागिर येथिल प्रसिद्ध व्यावसायिक अशोक गोठवाड हे नेहमीप्रमाणे आकोट कृ. ऊ. बा. स. येथिल आपल्या धान्य अडत दुकानात आले. दुकान ऊघडताच एक प्लॕस्टिकची थैली त्यांच्या दृष्टीस पडली. ती ऊघडताच त्यात एक चिठ्ठी आढळून आली. ती वाचताच अशोक गोठवाल हादरुन गेले. चिठ्ठीत त्याना चक्क ५ लक्ष रुपयांची मागणी करण्यात आली होती. ती रकम न दिल्यास त्याना व त्यांचे मुलास जिवे मारुन स्वतःही आत्महत्या करण्याची धमकी चिठ्ठी लिहिणाराने दिली होती. या चिठ्ठीबाबत गोठवाड यानी कुणाकडेच वाच्यता केली नाही. आपले वर्तनात कोणताही फरक दिसून न देता ते सायंकाळी ७ वाजता आकोट शहर पोलीस ठाण्यात गेले. ठाणेदार प्रकाश अहिरे याना चिठ्ठी दाखविली. त्यानी ताबडतोब याबाबत वरिष्ठाना कळविले. त्यानंतर उपविभागिय पोलीस अधिकारी रितु खोखर यांचेशी चर्चा करुन या संदर्भात अज्ञात व्यक्तीचे नावे भादवी कलम ३८६, ३८७, ५०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या कार्यवाहीनंतर आरोपीस पकडण्याचा बेत आखला गेला. या मिशनमध्ये आकोट शहर ठाणेदार प्रकाश अहिरे आणि ग्रामिण ठाणेदार नितिन देशमुख यांचेसह दोन्ही ठाण्यातील पोलीसांची टिम तयार करण्यात आली. प्रत्येकास आपआपली भूमिका सांगितली गेली. ह्या मोहीमेत उपविभागिय पोलिस अधिकारी रितु खोखर ह्यानी सुद्धा जबाबदारी स्विकारली. त्यानंतर २५ हजाराच्या ख-या नोटा व त्या खाली बच्चो की बँकच्या बनावट नोटा एका पिशवीत ठेवल्या. खंडणी मागणाराने ही रकम कुठे व कधी ठेवायची हे त्याच्या चिठ्ठीत नमूद केले होते. त्यानुसार २६ जूलै रोजी आकोट लोहारी मार्गावरील आसरा माता मंदिरानजिकच्या वळणापासून २०/२५ फुटावर असलेल्या फलकाजवळ अशोक गोठवाड यानी ही थैली रात्री ८ चे सुमारास नेऊन ठेवली, त्यापूर्वी ७ वाजताच या ठिकाणाचे सभोवती असलेल्या झुडूपात व गवतात पोलीस दबा धरुन बसले. स्वतः रितु खोखर, ठाणेदार अहिरे व देशमुख साध्या कपड्यात रस्त्यावर वावरत होते. या मिशनसाठी खास बनविण्यात आलेल्या व्हाॕट्स् अॕपच्या माध्यमातून आदेश दिले घेतले जात होते. या परिसरात पथदिवे नसल्याने सायंकाळी ७ वाजताच मिट्ट काळोख पसरतो. त्याचा पोलीसाना मोठा लाभ झाला. मात्र या ठिकाणी साप, विंचू यांची भिती होती. पाऊसही सुरु होता. तरीही पोलीसानी त्याची चिंता केली नाही. अशा स्थितीत आरोपी दहा वाजताचे सुमारास त्या ठिकाणी आला. आपली दुचाकी ऊभी करुन त्याने थैलीचा शोध घेतला. त्याने ती ऊचलताच पोलीसानी झडप घालून त्याला जेरबंद केले. आणि तब्बल तिन तास काटे, विंचु, साप यांची भिती न बाळगता केलेल्या कष्टाचे पोलिसाना फळ मिळाले.
या आरोपीचे नाव आशिष कन्हैयालाल सिकची असून तो शहरातील नया प्रेस परिसरात राहतो. हा ३२ वर्षीय युवक विवाहित असुन त्याला एक मुलगा आहे. तो मूळचा पाथर्डी येथिल रहिवासी आहे.
विशेष म्हणजे हा युवक अशोक गोठवाड यांचा चांगला परिचित असून तो त्यांच्या मुलाचा मित्र आहे. शिवाय त्याचे पिता व काका यांचाही अशोक गोठवाड यांचेशी जवळून परिचय आहे. या सिकचीचे घरी शेती असल्याने गोठवाड यांचे अडत दुकानाशीही त्याचा व्यवहार होत असतो. ही मोहीम राबविण्याचे दिवशी आशिष हा गोठवाड यांचे दुकानात बराच वेळ बसलेला होता. त्याच दिवशी गोठवाड यांचे ओळखीने आशिषच्या काकानी आपली गाडी दुस-याला विकली. त्या व्यवहारात गोठवाड, आशिष व त्याचे काका यानी कृऊबासच्या ऊपहार गृहात पेढेही खाल्ले. परंतु मजेदार बाब म्हणजे धमकीची चिठ्ठी लिहिल्याचा आशिषवर आणि ती चिठ्ठी गोठवाड यांचेवर कोणताही ताण जाणवत नव्हता.
या संदर्भात अशोक गोठवाड यांचेशी चर्चा केली असता त्यानी हृदय हेलावणारी माहीती दिली. त्यानी चिठ्ठीतील मजकुर सांगितला असता हे धमकीपत्र कि विनंती अर्ज असा प्रश्न पडला. आशिषने आपल्या पत्रात लिहिले आहे कि, गोठवाड आबा मी तुम्हाला चांगला ओळखतो. तुम्हीही मला ओळखता. तुमच्याकडे पुष्कळ पैसा आहे. आणि मी अडचणीत आहे, माझेवर कर्ज झाले आहे. म्हणून तुम्ही मला ५ लक्ष रुपये द्या अशी हात जोडून विनंती आहे. ते तुम्ही कुठूनही कमवाल. आज माझी स्थिती खराब आहे. परंतु ती चांगली झाल्यावर जानेवारी २०२३ मध्ये मी तुमचे पैसे परत करीन. परंतु तुम्ही मला पैसे न दिल्यास मी तुम्हाला व तुमचा मूलगा अमोल ह्याला मारुन टाकीन व स्वतःही आत्महत्या करीन. ह्यासोबतच आशिषने ही रकम कुठे व कधी ठेवायची याबाबतही लिहिले. हे सांगून अशोक गोठवाड यानी सांगितले कि, हा युवक सराईत गुन्हेगार नाही. परंतु त्याचे हातून होवू नये ती चूक झाली आहे. सराईत गुन्हेगार कधी हात जोडून विनंती करीत नाही, स्वतः आत्महत्या करीन आसे म्हणत नाही, पैसे परत करीन असेही नाही. पण कायदा आपले काम सोडीत नाही. तो अपराध्यास शासन करतोच. त्याच परिपाठानूसार पोलीस या प्रकरणी पुढिल तपास करित आहेत. या प्रकरणी आशिषला मदत करणारांचा शोध घेतल्या जात आहे. ही कारवाई उपविभागिय पोलिस अधिकारी रितु खोखर यांचे मार्गदर्शनात आकोट शहर ठाणेदार प्रकाश अहिरे, ग्रामिण ठाणेदार नितिन देशमुख,पोउनि चंद्राकांत ठोंबरे,
पोहेकॉ उमेशचंद्र सोळंके पोहेकॉ विलास मिसाळ, पोहेकॉ राजेश वसे, नापोका सुलतान पठाण, पोका सागर मोपोका मनिष कुलट, पोका विशाल हिवरे, पोका सुनिल नागे,पोका नासीर शेख, नापोका भास्कर सांगळे, पोका सचिन कुलट, पोकॉ अमोल बुंदे, पोका रुकेश हासुळे, पोका यशवंत जायभाये, पोका नारायण देवळे, पोका विकास सुरणर, मपोका रुपाली माणकर यानी पार पाडली.
Comments
Post a Comment