निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण गडावर वसलेली श्री रुद्रायणी देवी●रामविजय ग्रंथ व देवी भागवतामध्ये देवीची नोंद
निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण गडावर वसलेली श्री रुद्रायणी देवी
●रामविजय ग्रंथ व देवी भागवतामध्ये देवीची नोंद
बार्शिटाकळी ( मुफिज खान )
अकोला जिल्ह्यामधील बार्शिटाकळी तालुक्या मध्ये नैसर्गिक वारसा लाभलेले व पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाणारे चिंचोली येथील गोल आकाराच्या गडावर विराजमान रुद्रायणी देवी आदीशक्ती नावानेही संपुर्ण भारतात प्रसिद्ध आहे.
या आदीशक्ती देवीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रासह संपुर्ण भारतामधून मोठ्या संख्येने भाविक भक्त येथे येतात. या रुद्रायणी देवीचा तसा खूप जुना इतिहास असून ; रामविजय ग्रंथ व देवी भागवतात रुद्रायणी देवीचा उल्लेख आहे.
नैसर्गिक सान्निध्यात टेकडीवर विराजमान रुद्रायणी देवी गडावर नवरात्रात नऊ दिवस दर्शनासाठी भाविक भक्त मोठी गर्दी करत असतात. या देवीचे मंदिर तसे शेकडोवर्षे पूर्वीचे असून, याचा इतिहास फार मोठा आहे. अजंठाचे शेवटचे ठिकाण हे रुद्र टेकडी असून, या टेकडीच्या नावावरून रुद्रायणी देवीचे नाव पडले , अशी देवी भागवतामध्ये नोंद आहे. प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीता हे वनवासाला असताना ते रुद्रायणी देवीच्या दर्शनासाठी आल्याचे रामविजय ग्रंथामध्ये पाचव्या अध्यायात १२८ व्या ओवीमध्ये नोंद आहे. रुद्रायणी देवीच्या पायथ्याशी असलेला तलाव प्रभू रामचंद्र व सीतामाता ज्या ठिकाणी एकत्र फिरले त्या ठिकाणी चंद्रविकास कमळ आजही उगवत आहे.
हे कमळ फक्त दोनच ठिकाणी पाहावयास मिळतात एक अयोध्या मध्ये व दुसरे चिंचोली रुद्रायणी येथे देवीच्या पायथ्याशी असलेल्या तलावांमध्ये हे कमळ फक्त रात्रीच्या उजेडातच उगवतात. दिवसा ही कमळ उगवत नाहीत, असे येथील पुजाऱ्यांनी सांगितले. रुद्रायणी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना नैसर्गिक वातावरण मनमोहित करून टाकते. देवीच्या पायथ्याशी असलेले वनविभागाचे विविध देखावे व खेळणे त्यामुळे बच्चेकंपनीचे एक सहलीचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. नवरात्रात नऊ दिवस विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. सकाळी व संध्याकाळी आरती, भजने व सकाळी ११ ते २ यावेळेत महाप्रसादाचे मंडळाच्यावतीने आयोजन करण्यात येते.
Comments
Post a Comment