विदर्भाच्या पार्श्वभूमीवर आगळीवेगळी प्रेम कथा सांगणारा "तू फक्त हो म्हण" हा चित्रपट 14 आक्टोबरला प्रदर्शित होणार...
विदर्भाच्या पार्श्वभूमीवर आगळीवेगळी प्रेम कथा सांगणारा "तू फक्त हो म्हण" हा चित्रपट 14 आक्टोबरला प्रदर्शित होणार...
==============
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
प्रेमामध्ये काहीजण यशस्वी होतात, तर काहींना अपयश येते, अशाच प्रेमाची अनाहूत जाणीव झालेल्या प्रेमविराची कथा उलगडून दाखवणारा "तू फक्त हो म्हण" हा चित्रपट 14 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे. प्रेमासाठी त्याग संघर्ष आणि काहीही करण्याची तयारी असणाऱ्या या प्रेमविरांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, नंतर त्यांचे प्रेम कोणते वळण घेते ? हे वळण त्यांना एकत्र आणणार की वेगळे करणार ? यासोबतच प्रेमाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन सुद्धा या चित्रपटात मांडण्यात आलेला आहे. या संगीतमय प्रेम कथा असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. गणेश कुमार पाटील आणि भास्कर डाबेराव यांनी केले आहे. या चित्रपटात मोनालीसा आणि निखिल ही जोडी दिसणार असून नाळ व झुंड या चित्रपटानंतर गणेश देशमुख हे वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत, तर विदर्भाचे हरहुन्नरी व्यक्तिमत्व माजी आमदार तथा चित्रपट कलावंत प्रा. तुकाराम बिडकर हे आगळ्या वेगळ्या भूमिकेत असणार आहेत. तसेच सविता हांडे, पुष्पा चौधरी, झोया खान, रविशंकर शर्मा, आकाश ठाकरे तसेच अकोल्यातील युवा कलावंत राम विवेक पारस्कर यांचाही अभिनय प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री मानसी नाईक यांच्यावर चित्रित केलेले गीत या चित्रपटाचे खास आकर्षण असणार आहे. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील अतिशय सुंदर व विलोभनीय ठिकाणी या चित्रपटाचे चित्रीकरण झाले असून वऱ्हाडी भाषा हा या चित्रपटातील गाभा आहे. चित्रपटाचे कर्ण मधुर संगीत भास्करराव डाबेराव यांनी दिले आहे. विदर्भीय भाषेतील, विदर्भातील कलावंतांना घेऊन, विदर्भीयांनी विदर्भात चित्रित केलेला हा चित्रपट सर्वांनी अवश्य पहावा अशी विनंती करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment