राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त अंबादास बोरकर गुरुजी यांचा समर्पण अभिष्टचिंतन सोहळा संपन्न..!
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त अंबादास बोरकर गुरुजी यांचा समर्पण अभिष्टचिंतन सोहळा संपन्न..!
काही लोक जन्मत:च मोठी असतात, पण काही लोक आपल्या कर्तुत्वाने, आपल्या कार्यशैलीने मोठी होत असतात. यातीलच एक कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्त्व म्हणजे अकोला येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त श्री. अंबादासजी बोरकर गुरुजी होत. बोरी अरब या यवतमाळ जिल्ह्यातील छोट्याशा गावातून आपल्या आयुष्याची सुरुवात करून ज्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण संस्कार देऊन त्यांचे संपूर्ण आयुष्य उजळून टाकले त्यांचा समर्पण हा अभिष्टचिंतन सोहळा अकोला स्थित जानोरकर मंगल कार्यालयामध्ये नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरुजी होते. तर उद्घाटक म्हणून सुप्रसिद्ध गजल नवाज भीमराव पांचाळे होते .प्रमुख उपस्थितीमध्ये श्री
संजयजी पाचपोर, राष्ट्रीय संघटन मंत्री सहकार भारती मुंबई, प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख ,प्राचार्य डॉ. सुभाष गवई, श्री विक्रमजीत कलाने होते. सुरुवातीला सुप्रसिद्ध गायक गोपाल सालोडकर , डॉ नीरज लांडे , डॉ कुणाल इंगळे यांच्या गायनाने उपस्थित लोक मंत्रमुग्ध झाले तर भिमराव जी पांचाळे याच्या गझल गायनाने तर उपस्थीत सर्व भारावून गेले. बोरकर गुरुजी यांच्या जीवनाचा संपूर्ण पट त्यांचे चिरंजीव डॉ राजीव बोरकर संचालक, विद्यार्थी कल्याण संगाबा अमरावती विद्यापीठ अमरावती. यांनी प्रास्ताविकातून मांडला. तर मान्यवरांनी बोरकर गुरुजींच्या जीवन कार्याचा आढावा घेतला. बोरकर गुरुजी यांच्या समर्पण एक जीवनप्रवास या पुस्तकाचे विमोचन मान्यवरांनी केले. पुस्तक विक्रीची सर्व राशी उत्कर्ष अनाथ आश्रमाला देण्यात आली. *सेवा परमो धर्म* अशी प्रचिती उपस्थितांना आली. एक आदर्श शिक्षक कसा असावा याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे बोरकर गुरुजी होत असे प्रतिपादन प्राचार्य अरविंद देशमुख यांनी केले. प्राचार्य सुभाष गवई आणि विक्रमजीत कलानी यांनी बोरकर गुरुजींच्या जीवनपटावर प्रकाश टाकला.अध्यक्ष आचार्य वेरुळकर गुरुजींनी श्री. अंबादास बोरकर गुरुजी हे ज्ञानाचा नंदादीप असल्याचे प्रतिपादन केले. बोरकर
गुरुजींच्या फोटोची रांगोळी सर्वांचे मन वेधून घेत होती. याप्रसंगी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे डॉ. सुनील थावराणी ,डॉ. विक्रांत इंगळे, लोककलावंत माणिकराव ढोरे, शशिकांत शिंदे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ, प्राध्यापक विशाल कोरडे दिव्यांग फाउंडेशन अकोला यांचा कार्य गौरव सत्कार करण्यात आला.अभिष्टचिंतन सोहळ्याचे आभार सौ. संध्या राजीव बोरकर यांनी मानले. स्नेह भोजनाने समारंभाची सांगता करण्यात आली.
Comments
Post a Comment