बलुतेदारीतून झालेली घुसमट 'गोंडर' कादंबरीतून आली आहे - अशोक कुबडे
बलुतेदारीतून झालेली घुसमट 'गोंडर' कादंबरीतून आली आहे - अशोक कुबडे
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
___________________________________
-स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या भाषा संकुलात चर्चासत्र
- मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा
__________________________________
बारा बलुतेदारी पध्दतीतून आलेले वेदनादायी अनुभव मांडताना गोंडर या कादंबरीचे कथानक उभ राहिले आहे. गाव गाड्यात बारा बलुतेदारांनी आपल्या वाट्याला आलेले काम इमानेइतबारे करून समाजाची सेवा केली पण या व्यवस्थेमध्ये बलुतेदाराच्या वाटयाला बलुत्यात गोंडरच मिळाले असल्याने या बारा बलुतेदारी पद्धतीत बलुतेदार असलेल्या वारिक समाजाची घुसमट झाली ती घुसमट माझ्या 'गोंडर' या कादंबरीत प्रभावीपणे व्यक्त झाली आहे. असे मत 'गोंडर' कादंबरीचे लेखक अशोक कुबडे यांनी व्यक्त केले.
स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या भाषा वाड़:मय आणि अभ्यास संकुल आणि ज्ञान स्त्रोत केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त 'मुक्त चर्चा कादंबरीकारांशी' या कार्यक्रमात 'मी आणि माझे कादंबरी लेखन' या विषयावर अशोक कुबडे बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे ग्रंथालय प्रमुख तथा ज्ञान स्त्रोत केंद्राचे संचालक डॉ.जगदीश कुलकर्णी हे होते तर कादंबरीकार म्हणून नदिष्ट कादंबरीचे लेखक प्रा.मनोज बोरगावकर तसेच बोराची गाठ कादंबरीचे लेखक प्रा.महेश मोरे,डॉ.रमेश ढगे,प्रा.लक्ष्मी पूरणशेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
मराठी भाषा वाड़ःमय आणि अभ्यास संकुलातील संशोधन करणारे विद्यार्थी संकुलातील मराठी भाषेच्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी यांना कादंबरीकारांशी चर्चा करता यावी आणि कादंबरीकरांना कादंबरीची भूमिका मांडता यावी.. म्हणून मराठी भाषा पंधरवडा निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रास्ताविक डॉ. पृथ्वीराज तौर यांनी केले. यावेळी प्रा.मनोज बोरगावकर आणि प्रा.महेश मोरे यांनी आपली कादंबरी लेखनाची भूमिका मांडली.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. पृथ्वीराज तौर तसेच डॉ.योगिनी सातारकर-पांडे,डॉ.वैजनाथ अनमुलवाड, डॉ. दिलीप चव्हाण आदींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी विद्यापीठातील मराठी भाषेवर संशोधन करणारे विद्यार्थी आणि भाषा संकुलातील पदवीचे विद्यार्थी तसेच भाषा वाङ्मय संकुलातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment