गोरसेनेने अडविली भाजप उमेदवाराची वाट...
गोरसेनेने अडविली भाजप उमेदवाराची वाट...
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : बंजारा समाजासाठी निर्मित वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाला निधी देण्यासह विविध मागण्यासाठी गौर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांचा ताफा अडवत समाजाचे प्रश्न सुटत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
बंजारा समाजासाठी वसंतराव नाईक यांच्या नावाने असलेल्या आर्थिक विकास महामंडळाला निधी देणे, जात वैधता प्रमाणपत्र व नॉन क्रीमिलेअर अट, खोटे जात प्रमाणपत्र मिळवून नोकरी मिळवल्यामुळे बंजारा समाजातील युवकांवर अन्याय झाला. त्यासंदर्भात कार्यवाही करणे व इतर प्रश्नांकडे गेल्या काही वर्षांपासून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गौरसेनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीपसिंह व इतर पदाधिकाऱ्यांनी केला. होळी उत्सवानिमित्त वेगवेगळ्या तांड्यांवर - भाजपच्या उमेदवारांनी रविवारी भेट - दिली. यावेळी गौरसेनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीपसिंह चव्हाण आणि इतर पदाधिकाऱ्यांनी बार्शिटाकळी तालुक्यात भाजपचे लोकसभेचे उमेदवार व त्यांचा ताफा अडवून त्यांच्यापुढे भाजपचे मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील आमदार हरीश पिंपळे यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यासोबत बंजारा समाजातील प्रश्नाबाबत शासन दरबारी आवाज उठवत नसल्याबाबत जाबही विचारला.
'बंजारा समाजाच्या मतांवरच डोळा'
बंजारा समाजातील युवक व नागरिकांना भावनिक आधारावर आवाहन करीत त्यांच्या मतांवर राजकीय पक्ष डोळा ठेवतात. मात्र, त्यांच्या प्रश्नांबाबत कुठेही आवाज उठवला जात नाही. बंजारा समाजातील युवकांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविला जात नसल्याबाबत गौरसेनेचे अकोला जिल्हाध्यक्ष कुलदीपसिह चव्हाण यांनी भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांच्याजवळ नाराजी व्यक्त केली.
Comments
Post a Comment