सामाजिक व्यवस्थेचं भयाण वास्तव मांडणारी कादंबरी : गोंडर - शिल्पा राजेंद्र पवार
सामाजिक व्यवस्थेचं भयाण वास्तव मांडणारी कादंबरी : गोंडर - शिल्पा राजेंद्र पवार अमरावती
________________________________
बार्शिटाकळी : काही दिवसांपूर्वी एका समूहात जाहिरात पाहायला मिळाली कविकट्टा समूहाचे संस्थापक आदरणीय प्राध्यापक श्री.अशोक कुबडे सरांच्या 'गोंडर'कादंबरीची प्रथम आवृत्ती प्रकाशित करण्यात येणार असे कळले आणि म्हणता म्हणता ती केवळ सातासमुद्रापार वाचकांच्या पसंतीसच उतरली नाही तर एकामागोमाग एक असे राज्यस्तरिय 18 पुरस्कार या कादंबरीला मिळाले...दरम्यान मीही एक प्रत मागवली...माझ्या आईबाबांना वाचनाची प्रचंड आवड...सत्तरी पार केलेले माझे आईबाबा आठवड्यातून किमान प्रत्येकी 2 पुस्तकं म्हणजे एकूण 4 पुस्तके आठवड्यातून पुर्ण करतात म्हणजे करतातच शिवाय बाबांचं स्वतःचं असं छोटेखानी ग्रंथसंग्रहालय घरीच तयार करून ठेवलं आहे... विशेष म्हणजे काही पुस्तकं जुणी झाल्याने प्रत्येक पुस्तकाला कव्हर लावून बाबांनी स्वतःच्या सुंदर हस्ताक्षरात त्यावर नावंही लिहून ठेवली आहेत...अमरावतीत असलेल्या विभागीय ग्रंथालयाच्या इमारतीची तसेच तेथील अधिकारी कर्मचारी यांची मी बाबांना भेट घडवून दिली तर त्यांची वाचनसंपदा पाहून तिथल्या अधिकाऱ्यांसह कर्मचारीही अवाक झाले...आणि बाबांना प्रत्येक वेळी विशेष मदत मिळायला हे कारण पुरेसं ठरलं...मध्यंतरी या कादंबरीविषयी कळल्यावर माझ्या आई ने ती एका 3 दिवसात वाचून पूर्ण केली...तिची प्रतिक्रिया ऐकून जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने मीही कादंबरी वाचण्यास सुरूवात केली...एका चित्रपटाच्या कथानकाला शोभेल असं समाजव्यवस्थेचं भयाण वास्तव लेखकाने यात चपखल बसवलं आहे..प्रत्येक प्रसंग अगदी डोळ्यासमोर जिवंत झाला आणि जसाच्या तसा डोळ्यासमोरून तरळून गेला...बारा बलुतेदार पध्दती...त्यांतून निर्माण झालेली सामाजिक विषमता,सामाजिक दरी वाचकाला अंतर्बाह्य हेलावून सोडते...त्या काळातील जातीभेदनिहाय कुप्रथा व वेळोवेळी सामाजिक विषमतेमुळे मिळणारी दुय्यम,अपमानास्पद वागणूक वाचकाला अंतर्मुख करते...तत्कालीन बुरसटलेल्या वैचारीक बंधनांना लेखकाने वाचकासमोर ठेवलंय...समाजाचं एक जळजळीत सत्य त्यातील एकेका जीवंत प्रसंगातून उमटतं...उच्चभ्रू म्हणवल्या जाणाऱ्या उमाच्या वागणूकीमुळं जातीव्यवस्थेच्या पाशात अडकलेल्या एका गरिब हुशार 'यशवंताचे'..या कादंबरीतील नायकाचे उमेदीचे 2 वर्ष वाया जातात त्याच समाजव्यवस्थेच्या निखार् यात भाजत असतांना त्याचं स्वावलंबी जगणं वागणं समाजाला खटकतं आणि त्यांतून निर्माण झालेली जिद्द या समाजव्यवस्थे विरूद्ध त्याला बंड करावयास भाग पाडते...अशा नानाविध प्रसंगातून समाजव्यवस्थेचं यथार्थ दर्शन या कादंबरीतून घडतं...प्रत्येकाने वाचावी अशी सुंदर कादंबरी...सुरूवातीपासून शेवटापर्यंत खिळवून ठेवणार्या 'गोंडर' कादंबरीने पुरस्काराचे शतक पार करावे या सदिच्छेसह...
शिल्पा राजेंद्र पवार
वरिष्ठ कोषागार अधिकारी,
अमरावती
Comments
Post a Comment