शेख अजहर शेख जमीर यांची काँग्रेसच्या बार्शिटाकळी शहर ब्लॉक कार्याध्यक्षपदी निवड...
शेख अजहर शेख जमीर यांची काँग्रेसच्या बार्शिटाकळी शहर ब्लॉक कार्याध्यक्षपदी निवड...
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती चे सदस्य शेख अजहर शेख जमीर यांची नुकतेच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नियुक्ती पत्र देऊन बार्शिटाकळी शहर ब्लॉक कार्यअध्यक्षपदी निवड केली. या वेळी त्यांच्या सोबत माजी नगर पंचायत सदस्य सय्यद जहांगीर, सय्यद असद समाजसेवक, काँग्रेसचे प्रवक्ते मोहम्मद शोएब आदी उपस्थित होते. शेख अजहर हे काँग्रेस चे धडाडीचे कार्यकर्ते असून त्यांच्या या निवडी मुळे आगामी निवडणुकीत काँग्रेसला नक्कीच फायदा होईल असे लोकांचे म्हणणे आहे. सदर निवडी चे श्रेय ते प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना देत आहे.
पातूर नंदापूर येथे कृषी अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : पातूर नंदापूर परिसरामध्ये २५ जूनच्या रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. २४ तासांच्या अतिपावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. २४ जूनला पातूर नंदापूर परिसरामधील ९५ टक्के पेरणी संपुष्टात आली होती. कर्जबाजारी होऊन, उसणवारी करून वेळप्रसंगी सोने गहाण ठेवून महागामोलावे बियाणे आणून जमिनीमध्ये पेरणी केली आणि एकाच दिवशी पावसाने संपूर्ण शेतीची वाट लावली. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आता कृषी अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत.
नदी काठावरील व नाल्याच्या काठावरील जमिनी खरडून गेल्या, काही शेतकऱ्यांचे बियाणे जास्त पाऊस झाल्यामुळे उगवलेच नाही. त्यामुळे दुबार पेरणीचे संकटसुद्धा शेतकऱ्यांवर आले. एकाच पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत. तालुका कृषी अधिकारी वकृषी सहाय्यक यांनी २८ तारखेला बोरगाव खुर्द व पातूर नंदापूर गावच्या शेतकऱ्याच्या नदीच्या काठावरील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी, पिकाची सध्याची स्थिती, व्यवस्थापन, पेरणीची टक्केवारी व हवामान परिस्थितीनुसार आवश्यक त्या उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांनीही आपले प्रश्न व अडचणी मांडून समाधानकारक मार्गदर्शनाचा लाभ घेतला तालुका कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक शेतकरी सोबत नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. झालेल्या शेतीचे नुकसान वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत मी पोहोचवणार असे तालुका कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक यांनी सांगितले. पाहणी करता वेळेस तालुका कृषी अधिकारी सुधाकर खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी पर्यवेक्षक विजय महाजन अकोला, सहाय्यक कृषी अधिकारी सागर मोरे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी, पातूर नंदापूर येथील कोतवाल रवीआव्हाळे, बोरगाव खुर्द व पातूर नंदापूर येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गाव अंधारातून प्रकाशाकडे; दिवे बसवल्याने दिलासा
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : बार्शीटाकळी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या सारकिन्ही गावात ग्रामपंचायतीच्या वतीने अखेर रस्त्यावरील विद्युत खांबांवर नवीन पथदिवे बसविण्यात आले आहेत. यामुळे अनेक दिवसांपासून गावात पसरलेला अंधार कमी झाल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून गावातील काही भागांतील विद्युत खांबांवरील दिवे बंद पडले होते. त्यामुळे संपूर्ण परिसरात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले होते. रात्रीच्या वेळी गावातील मुख्य रस्त्यांसह इतर मार्गावरून ये-जा करणे धोकादायक बनले होते. विशेषतः चिखलयुक्त रस्त्यांमुळे अनेक वेळा नागरिकांचा अपघात झाला होता. या समस्येकडे ग्रामपंचायतीने गांभीर्याने लक्ष दिले असून, बंद पथदिव्यांच्या दुरुस्तीसह नवीन दिवेही बसविण्यात आले आहेत. त्यामुळे आता गावातील कानाकोपऱ्यात रोषणाईचे दृश्य दिसून येत आहे. नागरिकांनी या कामाची प्रशंसा केली आहे. गावातील महिलांना, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना आता रात्रीच्या वेळी रस्त्यावरून सुरक्षितपणे प्रवास करणे शक्य होणार आहे, अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
Comments
Post a Comment