कविता भिजपावसासारखी जनमानसात झिरपली पाहिजे - डॉ. सुरेश सावंत _________________________________ 'पाऊसधारा' कविसंमेलनात बरसल्या काव्यधारा _________________________________
कविता भिजपावसासारखी जनमानसात झिरपली पाहिजे - डॉ. सुरेश सावंत
_________________________________
'पाऊसधारा' कविसंमेलनात बरसल्या काव्यधारा
_________________________________
प्रतिनिधी श्रावण भातखडे
नादेड : आपली कविता कुठे आहे, हे जाणून घेण्यासाठी इतरांच्या कविता आवर्जून वाचल्या पाहिजेत. इतरांचे साहित्य वाचल्यानंतर आपण कुठे आहोत, हे आपल्याला कळायला लागतं. अलीकडे भरमसाठ कविता लिहिली जाते. लिहायला हरकत नाही, पण कवितेची ढगफुटी नको तर कविता भिजपावसासारखी जनमानसात झिरपली पाहिजे, असे विचार साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी डॉ. सुरेश सावंत यांनी व्यक्त केले.
कविकट्टा समूहाच्या वतीने डॉ. सुरेश सावंत आणि व्यंकटेश चौधरी यांचा विशेष सत्कार एम. पी. एस. इंग्लिश स्कूल येथे आयोजित करण्यात आला होता. या सत्कारास उत्तर देताना ते बोलत होते. सत्कार सोहळ्यानंतर 'पाऊसधारा' कविसंमेलन झाले. या कार्यक्रमात उपस्थित कवींना डॉ. सुरेश यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इसाप प्रकाशनाचे दत्ता डांगे हे होते. माणिक प्रभू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्याम पाटील तेलंग यांनी या कविसंमेलनाचे उद्घाटन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी प्रवीणा मांदळे, बालसाहित्यकार पंडित पाटील बेळीकर आणि शिवाजी अंबुलगेकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक कादंबरीकार अशोक कुबडे यांनी केले.
फार वर्षांपूर्वी कवी केशवसुतांनी ज. वा. हर्षे उर्फ आनंदीरमण ह्या कवीला उद्देशून एक पत्र लिहिले होते. त्या पत्रात केशवसुतांनी कवीमित्रांना प्रेमाने मार्गदर्शन केले आहे. ते पत्र सर्व कवींनी आवर्जून वाचले पाहिजे, असेही डॉ. सुरेश सावंत म्हणाले.
डॉ. सुरेश सावंत यांना त्यांच्या 'आभाळमाया' या कवितासंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि व्यंकटेश चौधरी हे मनपा शिक्षणाधिकारी पदावरून निवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन राम तरटे यांनी केले.
पावसाळी कवितांवर आधारित 'पाऊसधारा' कविसंमेलन आयोजित केले होते. या कविसंमेलनात नांदेड जिल्ह्यातील कवींनी आपल्या कविता सादर केल्या. यावेळी डॉ. दिलीप शिंदे, विजय चित्तरवाड, स्वाती कान्हेगावकर, विजय बंडेवार, व्यंकटेश काटकर, शंकर माने, प्रज्ञाधर ढवळे, अमृत तेलंग, मनोहर बसवंते, शिवाजी जोगदंड, दत्ता वंजे, बालाजी भागानगरे, ललिता शिंदे, अंजली मुनेश्वर, अलका मुकटकर, ज्योती परांजपे, राजश्री विभुते, रूपाली वागरे, उषाताई ठाकूर, वैशाली वागरे, अनिता जाधव, सुनंदा भगत, प्रतिभा पांडे, मारुती मुंडे, जगन्नाथ पाटील, चंद्रकांत कदम, चंद्रकांत चव्हाण, जाफरशा गोपाळचावडीकर, तानाजी मेटकर, पांडुरंग दाभाडे, राजेश पंडित, दिगंबर कानोले, अंजली सूर्यवंशी, वैष्णवी राऊत, ज्योती अंजली, बालाजी गवलवाड, डी. एन. मोरे, इ. कवींच्या चिंब भिजलेल्या कविता बरसल्या. कविसंमेलनाचे सूत्रसंचालन रुचिरा बेटकर यांनी केले. हा कार्यक्रम कविकट्टा समूहाचे संचालक अशोक कुबडे आणि कविकट्टा परिवाराने आयोजित केला होता.
Comments
Post a Comment