अकोला-मूर्तिजापूर, बार्शिटाकळी तालुक्यांना अतिवृष्टीग्रस्त घोषित करा, अन्यथा जनआंदोलन !! -समाजसेवक गजानन हरणे यांचा शासनाला इशारा...
अकोला-मूर्तिजापूर, बार्शिटाकळी तालुक्यांना अतिवृष्टीग्रस्त घोषित करा, अन्यथा जनआंदोलन !!
-समाजसेवक गजानन हरणे यांचा शासनाला इशारा.
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांच्या यादीत अकोला व मूर्तिजापूर तालुक्यांचा समावेशच केला नाही. तसेच बार्शिटाकळी तालुक्यातील फक्त एकच मंडळ घेतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांचे अतोनात झालेले नुकसान पाहता हा निर्णय केवळ अन्यायकारक नव्हे तर क्रूर ठरतो. या तालुक्यांतील शेतकऱ्यांनी आपले पिके डोळ्यादेखत वाहून जाताना पाहिली, मात्र शासनाने त्यांचे दु:खच नजरेआड केले, अशी संतप्त प्रतिक्रिया समाजसेवक गजानन हरणे यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या महिनाभरात पावसाने या तालुक्यांवर अक्षरशः थैमान घातले. सोयाबीन, कापूस, तूर आदी पिके पाण्यात बुडून गेली. शेतकऱ्यांच्या हातचे पीक गेले, खिशाला आधीच कर्जाचा डोंगर आहे, त्यात भर म्हणून बँका वसुलीसाठी नोटिसा बजावत आहेत. अधिकारी दडपण टाकत असल्याने अनेक शेतकरी नैराश्यग्रस्त होत आहेत."शेतकऱ्यांचा हा आक्रोश शासनाला ऐकू येत नाही का? नुकसान झालेले असूनही या तालुक्यांना यादीबाहेर ठेवणे हा यक्षप्रश्न आहे. जर शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून भरपाई, पीकविमा आणि कर्जमुक्ती दिली नाही, तर आम्हाला रस्त्यावर उतरून जनआंदोलन उभारावे लागेल,"येणारी दिवाळी सर्व शेतकरी "काळी दिवाळी "म्हणून साजरी करणार आहेत असा इशारा गजानन हरणे यांनी दिला.या मागणीसाठी निर्भय बनो जनआंदोलन, राष्ट्रीय लोक आंदोलन, स्वराज जनजागृती परिषद, शेतकरी जागर मंच, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन, किसान ब्रिगेड, शेतकरी संघटना क्रांतिकारी, सकळ मराठा कुंबी गरजवंत समाज अकोला जिल्हा यांसह विविध संघटनांचा पाठिंबा आहे. "शेतकऱ्यांना न्याय मिळावा, हीच आमची मागणी असून शासनाने जर तो नाकारला, तर शेतकऱ्यांच्या अश्रूंना जनआंदोलनाचे स्वरूप मिळेल," असा इशारा समाजसेवक गजानन हरणे यांनी प्रसिद्धी पत्रद्वारे दिला आहे.
Comments
Post a Comment