बहुचर्चित अक्षय नागलकर हत्येचा उलगडा — मुख्य आरोपीसह चौघांच्या मुसक्या आवळल्या!
बहुचर्चित अक्षय नागलकर हत्येचा उलगडा — मुख्य आरोपीसह चौघांच्या मुसक्या आवळल्या!
बार्शिटाकळी : शहरातील बहुचर्चित अक्षय नागलकर मिसींग प्रकरणाचा अखेर उलगडा झाला असून, पोलीसांनी मुख्य सूत्रधारासह चार आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. तब्बल ४८ तासांच्या अथक तपासानंतर पोलिसांनी हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आणले.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. शिला विनायक नागलकर यांनी दि. २३ ऑक्टोबर रोजी डाबकी रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती की, त्यांचा मुलगा अक्षय विनायक नागलकर (वय २६, रा. मारोती नगर, जुने शहर, अकोला) दि. २२ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५.१५ वाजता बाहेर गेला असून तो अद्याप परत आलेला नाही. त्यावरून मिसींग क्र. ४४/२०२५ नोंदविण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांनी तात्काळ तपासासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग, तसेच स्थानिक गुन्हे शाखा यांच्या ८ विशेष पथकांची नियुक्ती केली. या पथकांनी जिल्हा व जिल्हा बाहेरील विविध ठिकाणी शोधमोहीम राबविली.
तपासादरम्यान पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे संशयित चंद्रकांत बोरकर यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने कबुली दिली की त्याच्यासह ब्रम्हा भाकरे, रोहित पराते, किष्णा भाकरे, आशु वानखडे, शिवा माळी, आकाश शिंदे आणि अमोल उन्हाळे यांनी मिळून अक्षय नागलकर यास भौरद येथील MH-30 हॉटेलमध्ये जेवणाच्या बहाण्याने बोलावून जुन्या वादातून त्याचा खून केला. त्यानंतर त्याचे शव ब्रम्हा भाकरे यांच्या मोरगाव भाकरे येथील शेतातील टिनशेडमध्ये जाळल्याचे उघड झाले.
या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १) चंद्रकांत महादेव बोरकर, २) अशोक उर्फ ब्रम्हा पांडुरंग भाकरे, ३) किष्णा वासुदेव भाकरे, व ४) आशु उर्फ आशिष शिवकुमार वानखडे या चार आरोपींना अटक केली असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुदर्शन पाटील, प्रभारी अधिकारी श्री. अभिषेक अंधारे, सपोनि गोपाल ढोले, पोउपनि गोपाल जाधव, पोउपनि अनिल चव्हाण तसेच स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकांनी संयुक्तरित्या केली.
Comments
Post a Comment