फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे समाजसेवक गजानन हरणे यांचे आवाहन....
फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे समाजसेवक गजानन हरणे यांचे आवाहन....
बार्शिटाकळी (प्रतिनिधी श्रावण भातखडे ) :- दिवाळीच्या उत्सवाचे दिवस जवळ येत असताना बाजारपेठा उजळल्या आहेत. सर्वत्र फटाक्यांची दुकाने लागली असून मुलांच्या उत्साहाला उधाण आलेले दिसते. मात्र, या उत्साहामध्ये प्रदूषण, धोकादायक अपघात व आरोग्याच्या समस्या दडलेल्या आहेत. त्यामुळेच या वर्षीची दिवाळी फटाके मुक्त साजरी करण्याचे आवाहन समाजसेवक गजानन हरणे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.“दिवाळी ही प्रकाशाची, आनंदाची आणि ऐक्याची असावी. फटाक्यांच्या धुरामुळे आणि कर्णकर्कश आवाजामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व रुग्ण त्रस्त होतात. आगी लागून अनेकदा जीवित व आर्थिक हानी होते. यामुळे दिवाळीचा खरा आनंद हरवतो,” असे मत गजानन हरणे यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की, “फटाक्यांमुळे वाढणारे प्रदूषण हा गंभीर पर्यावरणीय प्रश्न आहे. या समस्येवर उपाय म्हणून कुटुंबानेच पुढाकार घेत ‘फटाके मुक्त परिवार’ निर्माण करावा. शाळा, महाविद्यालये व पालकांनी मुलांना प्रबोधन देणे हीच काळाची गरज आहे.”
गजानन हरणे, समाजसेवक तथा संयोजक निर्भय बनो जनआंदोलन, यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे तरुणाईसह सर्व नागरिकांना संदेश दिला की, “चला, या दिवाळीत आपण सर्वजण मिळून फटाक्यांच्या धुराऐवजी दिव्यांच्या प्रकाशाने, आवाजाऐवजी हास्यकल्लोळाने, आणि अपव्ययाऐवजी फराळाच्या गोडव्याने खऱ्या अर्थाने आनंदोत्सव साजरा करूया.”
Comments
Post a Comment