माणूस माणसाशी जोडला गेला की, देश आपोआप एकसंध होतो.”👉— ह. भ. प. अमोल महाराज घुगे. 👉अकोला नगरीत संत श्री भगवानबाबा पुण्यतिथी सोहळा भक्तिभावात संपन्न....
माणूस माणसाशी जोडला गेला की, देश आपोआप एकसंध होतो.”
👉— ह. भ. प. अमोल महाराज घुगे
👉अकोला नगरीत संत श्री भगवानबाबा पुण्यतिथी सोहळा भक्तिभावात संपन्न
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- ऐश्वर्य, त्याग आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या संत श्री भगवानबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त वंजारी समाज सेवा फाऊंडेशन, अकोला यांच्या वतीने आयोजित स्मृतिसोहळा रविवारी जानोरकर मंगल कार्यालय, अकोला येथे अत्यंत भक्तीमय, भावपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. अकोला शहरासह परिसरातील विविध स्तरातील नागरिक, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व भाविकांनी सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित राहून संतांच्या चरणी आदरांजली अर्पण केली.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पालखी सोहळ्याने झाली. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि जयघोषात वातावरण भक्तीरसाने भारून गेले. त्यानंतर संत श्री भगवानबाबा यांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करण्यात आले.
ह. भ. प. अमोल महाराज घुगे (आळंदी) यांच्या प्रभावी कीर्तनाने उपस्थितांना भावविवश केले. शिक्षण, संस्कार व सामाजिक एकात्मतेचे महत्त्व त्यांनी अत्यंत हृदयस्पर्शी कथांमधून मांडले. “माणूस माणसाशी जोडला गेला की देश आपोआप एकसंध होतो,” हा संदेश त्यांनी आपल्या ओघवत्या वाणीने उपस्थितांच्या मनात कोरला. अनेक भाविकांचे डोळे पाणावले.
या पुण्यतिथी सोहळ्याचे खरे वैशिष्ट्य म्हणजे वंजारी समाज सेवा फाऊंडेशन, अकोला यांच्या नियोजनाखाली समाजातील सर्व स्तरातील बांधवांनी एकत्र येत या उपक्रमात सहभाग घेतला. प्रवचनानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी वंजारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यामुळे उपस्थित पालकांच्या चेहऱ्यावर अभिमान आणि समाधान स्पष्ट दिसत होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री. विश्वनाथरावजी घुगे (उपजिल्हाधिकारी, वाशिम), श्री. गजाननरावजी दराडे (उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अकोला), सौ. साधनाताई संजयराव कराड (सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन, अकोला) आणि सौ. तरंगतुषार वारे (आरोग्य उपसंचालक, महाराष्ट्र) यांची उपस्थिती लाभली.
संत श्री भगवानबाबा यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार या निमित्ताने सर्व उपस्थितांनी व्यक्त केला. संपूर्ण कार्यक्रम श्रद्धा, एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीचा जिवंत संदेश देणारा ठरला.
Comments
Post a Comment