भारतरत्न जननायक कर्पूरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कार्यक्रम संपन्न....
भारतरत्न जननायक कर्पूरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कार्यक्रम संपन्न.....
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : - सामाजिक समतेचे महान पुरस्कर्ते, ओबीसी समाजाचे कैवारी व बिहारचे माजी मुख्यमंत्री भारतरत्न जननायक कर्पूरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अकोला येथे भव्य जयंती समारंभ व जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम शनिवार, दिनांक २४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता स्वराज्य भवन, अकोला येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून शेतकरी जागर मंचचे श्री. प्रशांत गावंडे यांचे जाहीर व्याख्यान झाले. त्यांनी कर्पूरी ठाकूर यांचे विचार, शिक्षण व आरक्षण क्षेत्रातील त्यांचे ऐतिहासिक योगदान तसेच सामाजिक न्यायासाठी केलेला संघर्ष यावर सविस्तर प्रकाश टाकला. लहान समाज सत्तेचे वाटेकरी झाल्याशिवाय त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक तसेच आर्थिक समस्या सुटू शकत नाहीत, यावर त्यांनी विशेष भर दिला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. प्रकाशजी नागपुरकर (संस्थापक अध्यक्ष, आस्था नागरी सहकारी पतसंस्था, अमरावती) उपस्थित होते. त्यांनी शिक्षण, प्रबोधन, संघटन व सहकार यांचे महत्त्व विशद केले. विशेष मार्गदर्शक म्हणून श्री. राहुलजी खंडारे सर (संस्थापक, नालंदा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उगवा) यांनी परिवर्तनवादी महामानवाच्या वैचारिक भूमिकेवर प्रकाश टाकत प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध लढ्याची त्या काळातील गरज अधोरेखित केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. विलासराव वखरे होते. त्यांनी ओबीसी समाजातील छोट्या जातींवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. महिला व बालकल्याण संरक्षण अधिकारी श्रीमती रूपाली पांडे यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी शिक्षण व नोकरीतील भागीदारीचे महत्त्व विशद केले.
या कार्यक्रमात सन २०२५ मध्ये शासकीय तसेच खाजगी क्षेत्रात नोकरीस लागलेले तसेच सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तींचा भारतरत्न जननायक कर्पूरी ठाकूर यांच्या छायाचित्रासह पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन ॲड. सुमित अंबुसकर यांनी केले, तर प्रास्ताविक श्री. भातुलकर साहेब यांनी मांडले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री विनोदभाऊ अंबुसकर, ॲड आनंद बुडईकर, हरिहर पळसकर, संजय शिरेकर सर, श्रावण भातखडे, भूषण अंबुसकर, आशीष लोळे, सतीश हणतोडे, विजय पिंपळकर, शुभम भातखडे, विनोदभाऊ डंगटे, प्रवीण पळसकर, राजेश लोळे, गणेश शिरेकर, अंकुश पिंपळकर, शिवा पिंपळकर व संदीप अंबुसकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जननायक कर्पूरी ठाकूर विचार मंच, अकोला यांच्यासह विविध संघटनांनी सहकार्य केले. यामध्ये नाभिक दुकानदार संघटना, श्री संत सेना महाराज प्रगती मंडळ, शिवछत्रपती अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी तसेच आस्था ग्रुप, अकोला यांचा समावेश होता.
Comments
Post a Comment