अनिष्ट चालीरीतींना तिलांजली देत परिवर्तनाचा संदेश;कमी खर्चाचे लग्न, कमी खर्चाची शेती—काळाची हाक!मराठा योद्धा गजानन हरणे यांचे समाजाला आवाहन...

अनिष्ट चालीरीतींना तिलांजली देत परिवर्तनाचा संदेश;
कमी खर्चाचे लग्न, कमी खर्चाची शेती—काळाची हाक!
मराठा योद्धा गजानन हरणे यांचे समाजाला आवाहन
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : समाजाच्या प्रगतीला अडसर ठरणाऱ्या अनिष्ट चालीरीती, अंधश्रद्धा व अवाजवी खर्चाच्या प्रथांना मूठमाती देत नव्या सामाजिक परिवर्तनाचा नवा अध्याय लिहिण्यासाठी मराठा पाटील समाज सज्ज झाला आहे. कमी खर्चाचे लग्न आणि कमी खर्चाची, शाश्वत शेती ही काळाची गरज असल्याचे ठाम प्रतिपादन करीत मराठा योद्धा गजानन हरणे यांनी समाजाला साद घातली आहे.
मराठा पाटील संघाच्या वतीने आयोजित समाज संवाद पदयात्रा सध्या बाळापूर तालुक्यात गावागावांतून मार्गक्रमण करीत असून, या यात्रेला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सकाळी आठ वाजता सुरू होणारी ही संवादयात्रा रात्री उशिरा दहा–अकरा वाजेपर्यंत अविरत चालू राहते. दररोज आठ ते दहा गावांमध्ये थांबून थेट जनतेशी संवाद साधत, त्यांच्या प्रश्न–समस्या जाणून घेत चर्चा व उपाययोजना मांडल्या जात आहेत.या पदयात्रेच्या माध्यमातून मराठा पाटील समाज जागृत, संघटित व परिवर्तनाभिमुख करण्याचे कार्य सुरू आहे. सामाजिक एकता, आर्थिक शिस्त आणि विवेकशील विचारांचा प्रसार हे या यात्रेचे प्रमुख उद्दिष्ट ठरले आहे. समाजातील खर्चिक लग्नपद्धती, अंधश्रद्धा, शेतीतील वाढते उत्पादनखर्च यावर प्रबोधन करत साधेपणा, आत्मनिर्भरता व विज्ञाननिष्ठा यांचा संदेश दिला जात आहे.
दिनांक १७ जानेवारीपासून सुरू झालेल्या या समाजसंवाद पदयात्रेचा २६ जानेवारी २०२६ रोजी समारोप स्व. प्रा. राजदत्त मानकर यांच्या वाडेगाव या गावात होणार आहे. संपूर्ण तालुक्यातून फिरणारी ही यात्रा सामाजिक एकतेचा दीप प्रज्वलित करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
या यात्रेत बाळापूर मराठा पाटील संघटनेचे पदाधिकारी, मार्गदर्शक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. संघटनेचे अध्यक्ष शरद वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवकराम ताथोड, ज्येष्ठ नेते संदीप पाटील, ज्येष्ठ समाजसेवक गजानन हरणे, अशोकराव अमानकर यांच्यासह संघटनेचे सचिव मधुसूदन माळी, कोषाध्यक्ष शशिकांत नकाशकर, गणेश मुरूमकर, प्रशांत गायकवाड, रुपेश पटोकर, विठ्ठल नळकांडे, धनंजय नेमाडे, महेश लांडे, प्रसिद्धीप्रमुख देवानंद साबळे तसेच मार्गदर्शक समन्वयक आनंदराव ठाकरे, श्रीराम लांडे, संजय कराळे, हिम्मतराव मेटांगे, पांडुरंग तायडे, बाळकृष्ण तायडे, जनार्दन तायडे, राजेश माळी आदींसह शेकडो कार्यकर्ते यात्रेत सक्रिय आहेत.काजीखेड ते वाडेगाव असा प्रवास करणाऱ्या या समाज संवाद पदयात्रेत ठरावीक तारखांना विविध गावांत मुक्काम व संध्याकाळी जाहीर सभा होत असून, त्या माध्यमातून समाजप्रबोधनाची मशाल पेटवली जात आहे. जानोरी–मोखा,दगडखेड–नागद–सागद, सोनाळा–बोरगाव वैराळे, हसनापूर–मोरगाव सादिजन, अडोशी–कडोशी, सोनगिरी–कसुरा–पारस आदी गावांमध्ये संवाद साधत परिवर्तनाचा संदेश पोहोचवला जात आहे.समाजहितासाठी विचारांची लढाई उभारणारी ही पदयात्रा म्हणजे केवळ चालता-बोलता कार्यक्रम नसून, विवेक, एकता आणि स्वाभिमानाचे सामाजिक आंदोलन ठरत आहे, असे मत उपस्थित गावकरी नागरिकांतून व्यक्त होत आहे. गावागावातील प्रचंड समाजाचा प्रतिसाद म्हणजेच यात्रा सफल झाल्याचे संकेत आहे. या यात्रेत गावातील पाटील समाज मोठ्या संख्येने सहभागी होऊन यात्रा यशस्वी करण्याकरता सहकार्य करीत आहे. 

Comments

Popular posts from this blog

एकाच दोरीला दोघांची आत्महत्या.....बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,