जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान; जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत बैठक👉कॉपी प्रकरण आढळल्यास होणार कठोर कारवाईजिल्हाधिकारी वर्षा मीना यांचा इशारा...
जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान; जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत बैठक
👉कॉपी प्रकरण आढळल्यास होणार कठोर कारवाई
जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचा इशारा
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत १० फेब्रुवारीपासून बारावी, तर २० फेब्रुवारीपासून दहावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. या परीक्षा अकोला जिल्ह्यात पूर्णतः कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात, यासाठी शिक्षण विभाग, पोलीस प्रशासन व संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले.
कॉपीमुक्त अभियानासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. अरविंद मोहरे, शिक्षणाधिकारी योजना संजयकुमार झापे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य डॉ.रत्नमाला खडके, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी माध्यमिक प्रमोद टेकाडे,सुभाष भालेराव,प्राथमिक उपशिक्षणाधिकारी जितेंद्र प्रधान, विस्तार अधिकारी विनोद मानकर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की, यंदा राज्य शासनाने दहावी व बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत. त्याअनुषंगाने सर्व परीक्षा केंद्रांवरील प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक राहणार आहे.
गटशिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित केंद्रप्रमुखांना सीसीटीव्ही बसविण्याबाबत लेखी सूचना द्याव्यात. ज्या केंद्रांवर सीसीटीव्ही नसल्याचे आढळून येईल, त्या ठिकाणी शिक्षकांची अदलाबदल करण्यात येईल, तसेच संबंधित केंद्राची मान्यता रद्द करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
परीक्षा काळात वीजेचे भारनियमन झाल्यास बॅटरी किंवा इन्व्हर्टरची पर्यायी व्यवस्था ठेवावी. संवेदनशील व अतिसंवेदनशील केंद्रांच्या परिसरात व्हिडीओ शुटींग, भरारी पथक व बैठ्या पथकांमार्फत विशेष तपासणी करण्यात येणार आहे. अनुचित प्रकार आढळल्यास तात्काळ कायदेशीर कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. परीक्षा केंद्रांवर एका बाकावर एकच विद्यार्थी बसविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महत्त्वाच्या विषयांच्या दिवशी कॉपीचे प्रकार होऊ नयेत, यासाठी विशेष दक्षता घेण्यात येणार आहे.
परीक्षा केंद्र परिसरात जमावबंदी आदेश
परीक्षा काळात सर्व परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात येत आहेत. या आदेशानुसार सार्वजनिक टेलिफोन, एसटीडी/मोबाईल केंद्र, आयएसडी, फॅक्स, झेरॉक्स केंद्र तसेच ध्वनिक्षेपके बंद राहणार आहेत. मात्र, परीक्षार्थी, परीक्षा कामकाजाशी संबंधित अधिकारी, शिक्षक, कर्मचारी व पोलीस यांना हा आदेश लागू राहणार नाही. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
कॉपी आढळल्यास कठोर कारवाई
कोणताही परीक्षार्थी कॉपी किंवा गैरवर्तन करताना आढळल्यास त्याच्याविरोधात पोलीस गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. तसेच संबंधित विषयाचा निकाल रद्द करण्यात येईल. गंभीर प्रकरणात संपूर्ण परीक्षेचा निकालही रद्द केला जाऊ शकतो, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्चदरम्यान असून, विद्यार्थी संख्या 26 हजार 353 व केंद्र संख्या 118 आहे. बारावीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 11 मार्चदरम्यान असून, विद्यार्थी संख्या 26 हजार 287 व केंद्र संख्या 87 आहे. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेत दक्षता समिती स्थापण करण्यात आली आहे.
परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी अमरावती विभागात विभागीय आयुक्त, शिक्षण उपसंचालक, जिल्ह्यात जिल्हाधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी, योजना शिक्षणाधिकारी, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी, शिक्षण विभागातील महिला अधिकारी व कर्मचारी यांच्या स्तरावर भरारी पथके निर्माण करण्यात आली आहेत.
पेपर वितरण केंद्र परिरक्षक 11 आहेत. संवेदनशील व अतिसंवेदनशील केंद्रांच्या ठिकाणी दहावी परीक्षेसाठी 21 व बारावीसाठी 22 बैठी पथके आहेत.
बार्शिटाकळी, पिंजर येथे भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
👉श्री संत गजानन महाराजांचा प्रगटदिन साजरा
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- रविवारी श्री संत गजानन महाराजांचा प्रगट दिन तालुक्यातील प्रत्येक गावा गावात, ठिकठिकाणी, महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते, प्रसंगी शेकडोवर गजानन भक्तांनी महाप्रसाद भंडाऱ्याचा लाभ घेतला.
पिंजर बार्शिटाकळी व इतर ठिकाणी श्री संत गजानन महाराजांचे मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे दिवसभर आयोजन करण्यात आले होते, प्रत्येक मंदिरावर किंवा आयोजित भंडाऱ्याच्या ठिकाणी भाविक भक्ताची प्रचंड अशी गर्दी महाप्रसाद घेण्यासाठी उसळली होती, पिंजर येथील श्री गजानन भक्तांनी बायपासवर नाष्टा व चहाचे आयोजन केले होते,
दरवर्षपिक्षा यावर्षी श्री संत गजानन महाराजांचा प्रगट दिन बार्शिटाकळी तालुक्यातील पिंजर सह प्रत्येक गावात, मंदिराचे ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्याचप्रमाणे आलेल्या सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे देखील ठिकठिकाणी वाटप करण्यात आले, रविवारी पिंजर येथील बायपासवर श्री संत गजानन महाराजांच्या भक्तांनी टेबल स्टॉल, व मंडप टाकून महाप्रसादाचे वाटप केले, पिंजर बायपासवर प्रतिष्ठित, व नेहमी लोकांच्या सुखा दुखात कामी पाडणाऱ्या धाडसी कार्यकर्त्यांनी रोडवरील येणाऱ्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या गाड्या थांबून त्यांना महाप्रसाद घेऊन जा, चहा नाश्ता करून जा, म्हणून मोठ्या भावनिक भावनेने आग्रह करत त्यांना महाप्रसाद वाटप केला श्री संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त गेल्या आठवड्याभऱ्या पासून दररोज विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी पार पडले आहे. शनिवारी सायंकाळी श्री संत गजानन महाराजांची पालखी मिरवणूक गावातून काढण्यात आली होती. यावेळी महिलांनी श्री संत गजानन महाराजांचा जल्लोष करून अनेक भाविक महिलांनी गाण्याचे गायन केले, गण गण गणात बोते चा, गजर केला, येथील श्री संत गजानन महाराज मंदिराचे अनिल वडुळकर, सुनीलभाऊ बडुळकर, यांनी महाप्रसाद घेणाऱ्या भाविकांची चांगली सोय केली,
काटेपूर्णा अभयारण्याचा ३८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- अकोला वन्यजीव विभाग अकोला अंतर्गत काटेपूर्णा अभयारण्याचा ३८ वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. ८ फेब्रुवारी १९८८ रोजी काटेपूर्णा अभयारण्य ची स्थापना झालेली होती. याप्रसंगी मा. श्री यशवंत नागुलवार, विभागीय वन अधिकारी तसेच मा. चेतन राठोड, सहायक वनसंरक्षक, अकोला वन्यजीव विभाग अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली काटेपूर्णा अभयारण्य येथे वर्धापन दिनाचे औचित्य साधून सर्व प्रथम स्वच्छता अभियान राबविण्यात आले. काटेपूर्णा अभयारण्यातील प्रवेशद्वार, बालोद्यान व एन आय सी परिसरातील साफसफाई करण्यात आली. काटेपूर्णा अभयारण्यामध्ये आलेल्या बाल पर्यटकांच्या हस्ते केक कापून वर्धापन दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमात बोलताना श्री अमित शिंदे वनपरिक्षेत्र अधिकारी अकोला वन्यजीव परिक्षेत्र यांनी वन्यजीव संरक्षण व संवर्धन याविषयी महत्व विषद केले. पाणी देणारे जंगल म्हणून काटेपूर्णा अभयारण्य ओळखले जाते. काटेपूर्णा अभयारण्यतील जंगलात ४८ प्रकारचे फुलपाखरू, २५ प्रकारच्या सस्तन प्राणी, १२५ प्रकारचे विविध रंगीबेरंगी पक्षी प्रजाती, १८ प्रकारच्या गवाताच्या, ५१ प्रकारच्या वृक्ष प्रजाती आढळतात. अशा निसर्ग संपन्न काटेपूर्णा अभयारण्य ला आजच भेट द्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निसर्ग कट्याचे अकोलाचे प्रमुख अमोल सावंत पक्षी निरीक्षक तसेच तुपकर वनपाल सर्वश्री पोटे, सुरणे, राठोड वनरक्षक तसेच सर्व रोजंदारी मजूर यांचे सहकार्य लाभले.
Comments
Post a Comment