तलाठ्यांच्या हलगर्जीमुळे शेतकरी हैराण 👉सोनगिरी येथील शेतकऱ्याची पालकमंत्र्यासह जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार....
तलाठ्यांच्या हलगर्जीमुळे शेतकरी हैराण सोनगिरी येथील शेतकऱ्याची पालकमंत्र्यासह जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : तालुक्यातील महसूल विभागाच्या संथ कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सोनगिरी येथील एका प्रलंबित प्रकरणामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, त्रस्त शेतकरी गोपाल विश्वंभर ढोरे यांनी थेट जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांकडे लेखी तक्रार केली आहे.
तक्रारीनुसार, सोनगिरी येथील तलाठी दीर्घकाळ रजेवर असल्याने शेतजमिनीच्या नोंदी आणि वारसा हक्काची कामे रखडली आहेत. तलाठी कार्यालयात उपलब्ध नसल्याने अर्ज धूळ खात पडले असून, शेतकऱ्यांना वारंवार कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.
तक्रारदाराने वरिष्ठ कार्यालयांतील समन्वयाबाबतही नाराजी व्यक्त केली आहे. विविध कार्यालयांशी संपर्क साधला असता, अधिकारी अधिकारक्षेत्राचे कारण पुढे करत जबाबदारी टाळत असल्याचा आरोप ढोरे यांनी केला आहे. धक्कादायक म्हणजे, रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांना खासगीत भेटण्याच्या सूचना काही स्तरांवरून मिळत असल्याने संभ्रम वाढला आहे. या कामातील विलंबाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा आणि दोषींवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तलाठी म्हणतात, भेटून बोलू !
या संदर्भात संबंधित तलाठी यांच्याशी संपर्क साधला असता, मी सध्या रजेवर होतो, आपण प्रत्यक्ष भेटून बोलू, अशी जुजबी प्रतिक्रिया देऊन त्यांनी अधिक बोलणे टाळले.
सोनगिरी येथील तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. संबंधित प्रकरणाची आणि कामातील विलंबाची पडताळणी करून नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही केली जाईल.
- रवींद्र कापशीकर, तहसीलदार, बार्शिटाकळी.
सारकिन्ही येथील रस्त्याच्या कामाची पाहणी
१३ फेब्रुवारी पासून काम सुधारित पद्धतीने सुरू झाले .
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- बार्शिटाकळी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सारकिन्ही गावातील वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत सुरू असलेल्या सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या कामाबाबत ग्रामस्थांनी निकृष्ट दर्जाचा आरोप केला होता. याबाबत 'लोकमत'मध्ये वृत्त प्रकाशित होताच पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) कामाची पाहणी करून मंजूर अंदाजपत्रकानुसार (इस्टिमेटनुसार) काम करण्याचे निर्देश दिले.
अंदाजे दहा लाख रुपयांच्या निधीतून हे काम हाती घेण्यात आले आहे.
११ फेब्रुवारी रोजी कामास सुरुवात झाली; मात्र रस्त्यावर आवश्यक गिट्टी, मुरूम, लोखंडी सळ्या तसेच योग्य दाबणी न करता थेट जमिनीवर काँक्रिट टाकण्यात येत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली असता.
पंचायत समितीच्या अभियंता भगत, अभियंता पांडे व उपअभियंता सादिक खान यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून ठेकेदारास मंजूर अंदाजपत्रकानुसार (इस्टिमेटनुसार) काम करण्याचे निर्देश दिले. संबंधित योजनेद्वारे विमुक्त व भटक्या जमातींच्या तांड्यांमध्ये रस्ते, पिण्याचे पाणी, गटारे व अन्य पायाभूत सुविधा उभारण्याचे उद्दिष्ट आहे.
गुणवत्ता कायम राखण्याची मागणी
१३ फेब्रुवारीपासून काम सुधारित पद्धतीने पुन्हा सुरू झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. कामाची गुणवत्ता कायम राखण्यासाठी प्रशासनाने नियमित देखरेख करावी, अशी मागणीही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment