शेतकऱ्याचा संयम सुटला; मोजणी शीटसाठी महिनाभर पायपीट ! 👉१ एप्रिलपासून 'आमरण उपोषणाचा' इशारा.....
शेतकऱ्याचा संयम सुटला; मोजणी शीटसाठी महिनाभर पायपीट !
👉१ एप्रिलपासून 'आमरण उपोषणाचा' इशारा.....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळीः प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी सामान्यांची कामे वेळेत पूर्ण करण्याऐवजी त्यांना कशी अरेरावी करतात, याचा संतापजनक प्रकार बार्शिटाकाळी तहसील कार्यालयात समोर आला आहे. आपल्या हक्काच्या शेतीची मोजणी होऊन महिना उलटला, तरी 'मोजणी शीट' मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या विझोरा येथील उमेश रमेश गवई या तरुण शेतकऱ्याने आता थेट प्रशासनाशी आरपारची लढाई पुकारली आहे. १ एप्रिल २०२६ पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा गवई यांनी पत्राद्वारे दिला आहे.
उमेश गवई यांची मौजे विझोरा येथे गट नं. ४० मध्ये शेती आहे. या शेतीच्या मोजणीसाठी त्यांनी रीतसर अर्ज केला होता. मोजणीसाठी त्यांना २४/०९/२०२५, १५/१०/२०२५ आणि उपअधीक्षक भूमी अभिलेख ०४/०२/२०२६ अशा तब्बल तीन तारखा देण्यात आल्या. अखेर अनेक फेऱ्या मारल्यानंतर २४ फेब्रुवारी २०२६ रोजी विचनकर यांच्यामार्फत मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली. नियमानुसार ४ दिवसांत मोजणी शीट मिळणे अपेक्षित असताना, आज महिना उलटूनही त्यांना कागदपत्रे देण्यात आलेली नाहीत. कर्मचाऱ्यांच्या
या अडवणुकीमुळे संतप्त झालेल्या उमेश गवई यांनी तहसीलदार आणि जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षकांना निवेदन देऊन कडक कारवाईची मागणी केली आहे. १ एप्रिलपर्यंत मोजणी शीट न मिळाल्यास होणाऱ्या परिणामांना प्रशासनच जबाबदार राहील, असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे. त्यांनी १ एप्रिल २०२६
पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा देखीला दिला आहे. या संदर्भात कार्यालय प्रमुख बाहेरगावी असल्याची माहिती मिळाली त्यामुळे त्यांची प्रतिक्रीया मिळू शकली नाही.
"जे होईल ते करून घ्या!" कर्मचाऱ्यांची मुजोरी
> पत्रात नमूद केल्यानुसार, सोमवारी २३ मार्च रोजी गवई पुन्हा भूमी अभिलेख कार्यालयात गेले असता, तेथील कर्मचायांनी त्यांना दाद देण्याऐवजी अत्यंत उद्धटपणे वागणूक दिली. "तुमच्याने जे होईल ते करून घ्या, आमचे काहीही वाकडे होत नाही," अशी उघड धमकीच कर्मचाऱ्यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या त्रासाबाबत उपअधीक्षकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी चक्क शेतकऱ्याचा नंबर 'ब्लॅक लिस्ट' मध्ये टाकल्याचा गंभीर आरोपही उमेश गवई यांनी केला आहे.
Comments
Post a Comment