१२ तासांत अनिकेत इंगळे खून प्रकरणाचा छडा…६ आरोपी पोलिसांच्या ताब्यात…. 👉हत्येच कारणही आलं समोर?

१२ तासांत अनिकेत इंगळे खून प्रकरणाचा छडा…६ आरोपी पोलिसांच्या ताब्यात…हत्येच कारणही आलं समोर?
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी :  बार्शिटाकळी तालुक्यातील निंबी गावात घडलेल्या अनिकेत इंगळे खून प्रकरणाचा अवघ्या १२ तासांत छडा लावत स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि बार्शिटाकळी पोलिसांनी संयुक्त कारवाईत सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे. शेतीच्या वादातून डोळ्यांत मिरची पावडर मिसळलेले पाणी टाकून हतोड्याने डोक्यावर वार करत अनिकेतची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा आरोप असून, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि रात्रभर राबविलेल्या शोधमोहीमेच्या आधारे आरोपींना जेरबंद केले.

दिनांक ३० जून २०२६ रोजी पोलीस स्टेशन बार्शिटाकळी हद्दीतील मौजे निंबी येथे फिर्यादी सौ. प्रार्थना भास्कर इंगळे यांनी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार, आरोपींनी संगनमत करून त्यांचा मुलगा अनिकेत भास्कर इंगळे (वय २७) याच्यासोबत शेतीच्या कारणावरून वाद घातला. त्यानंतर त्याच्या डोळ्यांत मिरची पावडर मिसळलेले पाणी टाकून हतोड्याने डोक्यावर वार करत त्याची हत्या केली. या तक्रारीवरून पोलीस स्टेशन बार्शिटाकळी येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आणि आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात झाली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर आणि बार्शिटाकळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रविण धुमाळ यांना आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि बार्शिटाकळी पोलीस स्टेशनची संयुक्त पथके तयार करण्यात आली.

संयुक्त पथकांनी रात्रभर शोधमोहीम राबवत बार्शिटाकळी व पातूर तालुक्यातील आरोपींची संभाव्य लपण्याची ठिकाणे, बसस्थानके, खासगी बसस्थानके तसेच इतर संवेदनशील ठिकाणी कसून तपास सुरू ठेवला.

पातूर परिसरातून दोन आरोपी ताब्यात 
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी विशाल सुरेश करवते (वय २८) आणि अमोल सुरेश करवते (वय ३०), दोघेही रा. निंबी, ता. बार्शिटाकळी, हे पातूर येथून फरार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. या खात्रीशीर माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने तात्काळ सापळा रचून दोन्ही आरोपींना अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले.

बार्शिटाकळी पोलिसांनी आणखी चार आरोपींना अटक

बार्शिटाकळी पोलीस स्टेशनच्या पथकानेही तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे या गुन्ह्यातील फरार आरोपी सुरेश हरिभाऊ करवते (वय ६०), रेखा सुरेश करवते (वय ५२), अस्मिता विनोद सुरवाडे (वय २५) आणि मयुरी अमोल करवते (वय २३),  सर्व रा. निंबी, ता. बार्शिटाकळी, जि. अकोला यांना ताब्यात घेतले.
ही संपूर्ण कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी (मूर्तिजापूर विभाग) वैशाली मुळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, बार्शिटाकळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रविण धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि बार्शिटाकळी पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तरीत्या पार पाडली.

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

एकाच दोरीला दोघांची आत्महत्या.....बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,