बार्शिटाकळीतील ग्रीष्मकालीन क्रीडा व व्यक्तिमत्व विकास शिबिराचा उत्साहात समारोप.... 👉जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण; विद्यार्थिनींच्या कामगिरीचे विशेष कौतुक....
बार्शिटाकळीतील ग्रीष्मकालीन क्रीडा व व्यक्तिमत्व विकास शिबिराचा उत्साहात समारोप
जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण; विद्यार्थिनींच्या कामगिरीचे विशेष कौतुक
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : तालुका क्रीडा संकुल, बार्शिटाकळी येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ग्रीष्मकालीन क्रीडा प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबिर-2026 चा समारोप शुक्रवार (दि. 19 जून) रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
शिबिरादरम्यान तायक्वांदो, बॉक्सिंग, कुस्ती, कबड्डी, आर्चरी तसेच विविध मैदानी खेळांचे दर्जेदार प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याबरोबरच शिस्त, नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व विकासालाही चालना मिळाली.
समारोप कार्यक्रमात प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी अकोला जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा मीना यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधत विशेषतः मुलींच्या उल्लेखनीय सहभागाचे आणि त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील प्रगतीचे भरभरून कौतुक केले. सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर उच्च स्तरावर यश संपादन करण्याचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमास तालुका क्रीडा अधिकारी श्री सतीशचंद्र भट, क्रीडा अधिकारी श्री राजेश गावंडे तसेच द ग्रेट मराठा मित्र मंडळाचे संचालक श्री नरेश रत्नपारखी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी तालुका क्रीडा संकुलाचे क्रीडा मार्गदर्शक शिवाजीराव चव्हाण, लिपिक सुमित राठोड, राम ठोंबरे आणि मुकिंदा उपरास यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या समन्वय आणि मेहनतीमुळे शिबिर यशस्वीरित्या पार पडल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या शिबिरामुळे तालुक्यातील खेळाडूंना विविध क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण मिळून त्यांच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळाली असून भविष्यातील सक्षम खेळाडू घडविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत फलदायी ठरल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
Comments
Post a Comment