पुनोती बु. येथे टाळ-मृदुंगाच्या गजरात काकड आरतीला भक्तिमय प्रारंभ.... 👉३० वर्षांपासून अखंड परंपरा; नव्या पिढीला धार्मिक संस्कारांची जोड....
पुनोती बु. येथे टाळ-मृदुंगाच्या गजरात काकड आरतीला भक्तिमय प्रारंभ
👉३० वर्षांपासून अखंड परंपरा; नव्या पिढीला धार्मिक संस्कारांची जोड
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- कार्तिक मासानिमित्त पुनोती बु. येथे पहाटेच्या प्रसन्न वातावरणात टाळ-मृदुंगाच्या गजरात काकड आरतीला भक्तिमय प्रारंभ झाला. शिवा भातकर यांच्या घरून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून, महिनाभर संपूर्ण गावातून काकड आरतीची फेरी काढली जाणार आहे.
गेल्या ३० वर्षांपासून गावात काकड आरतीची परंपरा अखंडपणे सुरू आहे. गावकऱ्यांच्या पुढाकारातून दरवर्षी या उपक्रमाचे नियोजन केले जाते. पहाटेच्या वेळी हरिनामाचा जयघोष, विठ्ठल-रखुमाईचा गजर आणि संतांच्या अभंगांनी संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघत आहे. 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या नामघोषाने परिसरातील वातावरण चैतन्यमय होत आहे.
या उपक्रमामागे केवळ धार्मिक परंपरा जपण्याचा उद्देश नसून, नव्या पिढीला संतांचे विचार, धार्मिक संस्कृती आणि संस्कारांची ओळख व्हावी, हाही महत्त्वाचा हेतू आहे. तसेच मुलांमध्ये पहाटे लवकर उठण्याची सवय लागावी, त्यांच्यात शिस्त, भक्तिभाव आणि सामूहिक सहभागाची भावना निर्माण व्हावी, यासाठी गावकरी विशेष प्रयत्न करतात.
तीन दशकांपासून सुरू असलेली ही परंपरा आजही गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून जपली जात असून, धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे प्रेरणादायी कार्य या माध्यमातून होत आहे.
Comments
Post a Comment